कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीबीआय कोर्टात आज बाबरी मस्जिद खटल्याचा ऐतिहासिक निकाल लागला. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्या येथे हजारो कारसेवकांनी बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडला होता. आज (बुधवार) लखनऊ येथे सीबीआय कोर्टात ४९ पैकी हायात असणाऱ्या ३२ आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली. विनय कटियार, धर्मादास, पवन कुमार पांडे, चंपतराय, लल्लू सिंग आज निकाला दरम्यान कोर्टात हजर होते. आज या निकाला बद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
तर वयाच्या कारणामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी तर उमा जोशी या रुग्णालयात असल्यामुळे निकाला दरम्यान कोर्टात हजर राहू शकले नाहीत. पुराव्याअभावी या ३२ आरोपींना क्लीन चिट मिळाली. या केसमध्ये कोर्टाने ३५४ जणांची साक्ष घेतली. कोर्टामध्ये वकील मनिष त्रीपाठी यांनी कारसेवकांची बाजू मांडली.
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण केला. भारत माता की जय, जोर से बोलो जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आयोध्या तो झाकी है काशी मथुरा बाकी है, वंदे मातरम अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये म्हणाले, गेली ५० वर्षे सुरु असणारा हा वाद, प्रलंबित प्रश्न तसेच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर या खटल्यामधील गुन्हे दाखल केले होते आज सुप्रीम कोर्टाच्या सकारात्मक निर्णयाने भाजपा नेत्यांची निर्दोष मुक्तता होऊन खऱ्या अर्थाने आज मोठे आंदोलन यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.
जिल्हा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, अनेक वर्षापासून हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिरावर एका विस्तारवादी बाबराने अतिक्रमण करून मस्जिद उभारली होती. याविरोधात ६ डिसेंबर १९९२ रोजी राम भक्तांनी, कारसेवकांनी या मस्जिदीचा ढाचा पाडला होता. आज सुप्रीम कोर्टाने घडलेली घटना ही नियोजित कट नसून अचानक घडलेली घटना होती या आधारे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली त्याबद्ल कोर्टाच्या निर्णयाचे आभार मानले.
सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, बाबरी मस्जिद खटल्यामुळे गेली अनेक वर्षे देशातील वातावरण ढवळून गेले होते. या निकालामुळे आता यापुढे बाबरी मस्जिद असे नाव न घेता राम जन्मभूमी असे नाव घ्यावे. हिंदू धर्माचा मानबिंदू असणारा हा विषय मार्गी लागला त्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगितले.
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, ज्या राम जन्मभूमीवर एका घूसखोर बाबराचे थडगे बांधले गेले ते काढायला आपल्याला आपल्याच देशात ५०० वर्षे संघर्ष करावा लागावा ही दुर्देवी बाब आहे. ज्यावेळी भारताची फाळणी झाली त्यावेळी भारताचे हिंदुस्तान आणि पाकिस्तान हे दोन भाग वेगळे झाले. असे असताना या कॉंग्रेसने एका धर्माचा अनुनय करण्यासाठी सातत्याने एका समाजाला पाठीशी घातले यामुळे आपल्याच देशात आपले राम मंदीर सोडवायला आपल्या पुर्वजांना संघर्ष करावा लागला. आगामी काळात देखील नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार हिंदुत्वाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावतील अशी ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, विजय अग्रवाल, अमोल पालोजी, राजू मोरे, सचिन तोडकर, जिल्हा चिटणीस प्रमोदिनी हर्डीकर, प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, भाजपा गटनेते अजित ठाणेकर, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, मंडल अध्यक्ष संतोष माळी, प्रग्नेश हमलाई आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.