मुंबई (प्रतिनिधी) : सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या आणि लाखों स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ११ ऑक्टोबर रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
आज (शुक्रवार) मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यात परीक्षा घेऊ नये, या मागणीसाठी आंदोलनाचे रान पेटले होते. यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. या परीक्षेला पात्र असणारे सर्व विद्यार्थी पुढच्या परीक्षेला पात्र ठरणार आहेत.