कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील गंगावेश ते शिवाजी पूल दरम्यान रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाली आहे. वाहनधारकांसह नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी आज (बुधवार) आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून कोकण, गगनबावडा, गोवा, जोतिबा, पन्हाळा या मार्गावरील वाहतूक या रस्त्यावरून सुरू असते. हा रस्ता आखरी रस्ता म्हणून ओळखला जातो. तर पंचगंगा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंतयात्रा याच मार्गावरून जातात. गतवर्षीच्या महापुरामुळे तसेच पाईपलाईन कामासाठी खुदाई केल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पंचगंगा नदी ते पंचगंगा हॉस्पिटल या रस्त्यावर काँक्रिटीकरण तर गंगावेश ते पंचगंगा हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने, बैठका झाल्या असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. तरी गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष किशोर घाडगे, राकेश पाटील, रियाज बागवान, सुरेश कदम यांच्यासह आखरी रास्ता कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.