कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात काही ठिकाणी आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना निषेधार्थ आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास कायदा हातात घेऊ नये. नागरिकांनी त्याबाबत प्रशासनाकडे दाद मागावी. अथवा थेट माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आ. चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.

कोरोनाच्या काळात वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, पोलीस कर्मचारी यासह अनेकांनी आपल्या जिवावर बेतून कर्तव्य बजावले आहे. डॉक्टरांना आपल्याकडे देवाचा दर्जा दिला जातो. परंतु ते देव नसून मनुष्यच आहेत. हे सर्व नागरिकांनी समजून घ्यायला हवे. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, पोलीस कर्मचारी या कोवीड योध्दावर हल्ले होणे निंदणीय बाब आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कोरोना योद्धाना समजून त्यांचा सन्मान करावा व त्यांच्यावर हल्ला किंवा मारहाण करू नये, असेही आ. जाधव यांनी म्हटले आहे.