नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेतल्यानंतर त्यावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. चंद्र आणि मंगळ ग्रहावर जाणाऱ्या सॅटेलाइटला पृथ्वीवरून नियंत्रित केले जाऊ शकते तर ईव्हीएम मशीन का हॅक केल्या जाऊ शकत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी केला आहे.

उदित राज यांनी ट्विट करून बिहार निवडणुकीवर भाष्य केले आहे. अमेरिकेत ईव्हीएम मशीन असत्या तर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक हरले असते काय ?  असा सवाल उदित राज यांनी एका ट्विटमधून केला आहे. दुसऱ्या ट्विटमधून त्यांनी ईव्हीएम मशीनचा थेट संबंध चंद्र आणि मंगळ ग्रहाशी जोडला आहे. चंद्र आणि मंगळावर जाताना त्या उपक्रमाची दिशा जर पृथ्वीवरून नियंत्रित केल्या जाऊ शकते तर ईव्हीएम का हॅक केल्या जाऊ शकत नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलला होता. यावेळी त्यांनी ईव्हीएमला ‘एमव्हीएम’ म्हणजे ‘मोदी व्होटिंग मशीन’असे नाव दिले होते.