कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आयसीआयसीआय बँक व आयसीआयसीआय फाउंडेशनकडून कचरा उठावसाठी महापालिकेला पाच इलेक्ट्रिक टिप्पर वाहने आज देण्यात आली. त्याचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील व प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापुरातील वाढता कचरा प्रश्न पाहता हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, आयसीआयसीआय बँक व आयसीआयसीआय फाउंडेशनकडून कचरा उठावसाठी महापालिकेला पाच इलेक्ट्रिक टिप्पर वाहने सुपूर्द करण्यात आली आहेत. हा कार्यक्रम महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात पार पडला. यावेळी आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक झोनल मॅनेजर पवन माळवी व रिजनल मॅनेजर प्रकाश मेश्राम यांनी प्रशासकांकडे वाहने सोपविली.

या गाड्यांची 550 किलो कचरा वाहून नेण्याची क्षमता आहे. प्रत्येकी सहा लाखप्रमाणे 30 लाखांच्या या गाड्या आहेत. चार तासांत चार्ज होऊन 120 किलोमीटर धावते. ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी दोन कप्पे देण्यात आले आहेत. आमदार पाटील यांनी या गाडीची संकल्पना आयसीआयसीआय बँकेकडे व्यक्त केली. त्याला अनुसरून या गाड्या देण्यात आल्या आहेत. यासाठी रिजनल मॅनेजर विकास देशमुख यांचे सहकार्य लाभले.

तसेच या कार्यक्रमाला या वेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उपायुक्त साधना पाटील, सहायक आयुक्त संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील, अर्जुन काळे, लक्ष्मीकांत स्वामी, दीपक पाटील, मयूर येवला, निलोफर आजरेकर, संजय मोहिते, शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, अर्जुन माने, पूजा नाईकनवरे, उमा बनछोडे, शोभा कवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.