कोल्हापूर (प्रतिनिधी) : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी चार हजारांची लाच घेताना इचलकरंजीमधील शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलला आज (गुरुवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. पांडुरंग लक्ष्मण गुरव (रा. खानापूर ता.भुदरगड, मूळ रा. पिरळ, ता.राधानगरी) असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इचलकरंजीमध्ये तक्रारदार आणि त्यांच्या आई विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग गुरव याने चार हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर पथकाने सापळा लावून पांडुरंग गुरव याला लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहा. फौ. संजीव बंबरगेकर, पो.हे.कॉ. अजय चव्हाण, पो.ना. विकास माने, सुनिल घोसाळकर, नवनाथ कदम, पो.कॉ. मयूर देसाई यांनी केली.