गारगोटी (प्रतिनिधी) : मराठा समाजाने नेहमीच देण्याची भूमिका घेतली असून हा समाज लढवय्या आहे. आरक्षण मिळेपर्यंत मी थांबणार नसून समाजातील युवकांनी निराश होऊ नये. असे आवाहन आज खास. संभाजीराजे छत्रपती यांनी भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे केले. भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज पाटगाव येथे संघर्ष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवरायांचे गुरू श्री मौनी महाराज समाधीचे त्यांनी दर्शन घेऊन मराठा आरक्षण लढ्याची त्यांनी सुरुवात केली. तसेच खा. संभाजीराजे यांनी छत्रपती शिवरायांचे पुतळ्याचे पूजन केले. यावेळी माजी आम. दिनकरराव जाधव, सचिन भांदिगरे, कु.किरण आबिटकर, कु. गायत्री जाधव, कु.प्राची सुतार, कु.ऋतुजा गुरव रणरागिणींची भाषणे झाली.
खा. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ८० टक्के मराठा समाज आज गरीब आहे, त्यांना रहायला घर सुद्धा नाहीत. पूर्वी आणि आताही मराठा समाजाने नेहमीच त्यागाची आणि देण्याची भूमिका घेतली आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा समाज आहे. इतर समाजाच्या सेवा सवलती काढून घेऊन किंवा आर्थिक दुर्बल घटकांच्या सवलती समाजाला नको आहेत. यासाठी आम्ही ५८ मोर्चे काढले ? स्व. आण्णासाहेब पाटील यांचे आणि ४२ मराठा युवकांचे बलिदान मग कशासाठी दिलं ?असा सवाल केला. मराठा समाजाला इडब्ल्यूएसच्या सवलती देण्यापेक्षा स्वतंत्र आरक्षण द्यावे. मराठा आरक्षणासाठी समाजाचा एक सेवक म्हणून नेहमीच पुढाकार घेणार असून संसदेत व रस्त्यावर आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भुदरगड तालुक्यातील अनफ बुद्रुक आणि अनफ खुर्द ही दोन गावे पूर्णतः मुस्लिम समाजाची म्हणून ओळखली जातात. गारगोटी व परिसरातील युवक मोठ्या संख्येने या संघर्ष सभेस गेला होता. या सर्वांना अल्पोपहार आणि पाण्याच्या बाटल्या मुस्लिम समाजाकडून देण्यात आल्या.
यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीस महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघ यांनी पाठिंबा दिला, महासंघाचे राज्याध्यक्ष अनिल मोरे, जिल्हाध्यक्ष जयवंत वायदंडे, सुनील कोळी, सचिन लोहार यांनी पाठींब्याचे पत्र संभाजीराजे यांना दिले, शिवाय मुस्लिम समाजानेही यावेळी पाठींबा दिला.
या संघर्ष सभेसला आ. प्रकाश आबिटकर, राहुल देसाई, सत्यजित जाधव, प्रा. अर्जुन आबिटकर, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, जयवंत गोरे, गारगोटी सरपंच संदेश भोपळे, मच्छिंद्र मुगडे, धनाजीराव देसाई, विश्वजित जाधव, प्रविणसिह सावंत,तुकाराम देसाई नाथाजी पाटील, विश्वनाथ कुंभार, सचिन देसाई आदी उपस्थित होते.