इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील माणुसकी फाउंडेशनने आत्तापर्यंत निराधार व्यक्तींना आधार दिला आहे. इचलकरंजी परिसरातील खंजीरे पेट्रोल पंपाच्या मागे एका निराधार वयोवृद्ध व्यक्तीचा मुक्काम असायचा. ती वयोवृद्ध व्यक्ती मिळेल ते अन्न खाऊन त्याठिकाणी झोपलेली असायची. यावेळी माणुसकी फाउंडेशनचे हातकणंगले शाखेचे प्रमुख सचिन कुंभार यांच्या निदर्शनाला ही व्यक्ती आली.

याची माहीती कुंभार यांनी इचलकरंजी फाउंडेशनच्या सदस्यांना दिली. ही माहिती मिळताच इम्रान शेख आणि आकाश नरुटे यांनी याठिकाणी तातडीने गेले. त्यावेळी या वृद्धाची प्रकृती ठीक नसल्याने त्याला इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही व्यक्ती मानसिक रुग्ण असल्यामुळे त्याला काहीच समजत नव्हते. हा वृद्ध कित्येक दिवस उपाशी असल्याने त्याची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. या वृद्धाची माणूसकी फाउंडेशनच्या सदस्यांनी समजूत काढत धीर दिला आणि उपचार सुरु केले.  

तसेच या वृद्धाला बेघर रात्र निवारा केंद्रामध्ये दाखल करत जेवण्याची आणि राहण्याची सोय केली. या वृद्धाला आधार देत त्याचा जीव वाचवल्याने माणूसकी फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.