वारणा (प्रतिनिधी) : महाविद्यालय म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, पालक या तीनच घटका पुरते मर्यादित नसून शासन, औद्योगिक वसाहती, राज्यकर्ते, प्रसारमाध्यमे, शिक्षणतज्ञ, संशोधक, नवउद्योजक अशा समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. सक्षम विद्यार्थी आणि पर्यायाने समाज घडवण्याचे महाविद्यालयांचे ध्येय निश्चितच प्राप्त करता येऊ शकत असल्याचा विश्वास श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कार्जिनी यांनी व्यक्त केला.

तसेच शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येकाने पदाचे योग्य नेतृत्व केल्यास अत्यंत कमी कालावधीमध्ये जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणे शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संशोधनाकडे जबाबदारी म्हणून न पाहता काळाची गरज म्हणून पाहावे. ते श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचालित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पी एम् उषा योजनेअंतर्गत संशोधन उपक्रमाद्वारे महाविद्यालयांच्या क्षमतांचा विकास या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते.

यावेळी शास्त्रज्ञ जयवंत कोल्हे यांनी, डीआरडीओ सारख्या संस्था कायमच महाविद्यालयांना संशोधनासाठी प्रोत्साहन देत असल्याचे सांगून डीआरडीओ मार्फत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली.

कमी वयात केलेले संशोधन आणि पी एच् डी संपादन केल्यामुळे अध्यापनाची गुणवत्ता सुधारते तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांशी केलेले सामंजस्य करार संशोधनाची व्याप्ती वाढवण्यास मदत करत असल्याचे व्हिजेटिआयचे डायरेक्टर डॉ सचिन कोरे यांनी नमूद केले.

दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा अशा विविध राज्यांतील नामवंत महाविद्यालयातून १५० अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. डॉ जॉन डिसोझा यांनी दोन दिवसीय कार्यशाळेचा सारांश मांडला. डॉ ए एम् शेख यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी डॉ. एस्. व्ही. आणेकर, डॉ. एस्. एम्. पिसे, डॉ. उमेश देशनवार, डॉ. संजीवकुमार खंडाल, शोभा कुंभार, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. सौरभ बोरचाटे, डॉ. एस्. एस्. खोत, डॉ. किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.