राधानगरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ऐतिहासिक कृषीविषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडविणारे पाऊल उचलले आहे. या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखंडातून मुक्त होऊन आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला विक्री आणि बाजारपेठेचे स्वातंत्र मिळणार आहे. आपला शेतीमाल कुठेही  आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र मिळणार आहे.

या ऐतिहासिक कृषीविषयक विधेयकाला देशातील सर्व राज्यांनी मंजूरी दिली. परंतु महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज (बुधवार) तहसीलदार कार्यालय, राधानगरी येथे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा, किसान मोर्चा राधानगरी तालुका, यांच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या या महाविकास आघाडीच्या आदेश पत्रकाची होळी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, तालुका उपाध्यक्ष स्वप्नील पातले, भारतीय जनता पार्टीच्या सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, आघाडीप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.