अहमदाबाद : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या विश्वचषकातील हायव्होल्टेज सामन्याला आता काही तासांचा अवधी राहिला आहे. विश्वचषक स्पर्धेत 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये सामना रंगणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्याकडे लागले आहे.

भारत-पाकिस्तान सामना म्हटले की, क्रिकेट चाहत्यांमध्ये हायटेन्शन असतं. दोन्ही संघांवरही जिंकण्याचे तितकेच दडपण असते. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोनही संघ प्रत्येकी दोन सामने जिंकलेत. त्यामुळे विजयाची हॅट्ट्रीक करण्यासाठी रोहितसेना आणि बाबरसेना सज्ज झाले आहेत. 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मावर जास्त दबाव असणार आहे, कारण विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पहिल्या पराभवाचा ठपका पडू नये यासाठी रोहित शर्मा प्रयत्नशील असणार आहे. या सामन्यात रोहित शर्माबरोबर भारताचा आणखी एक खेळाडू भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर हार्दिक पांड्या सहकर्णधार असणार आहे. पांड्या प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे टीम इंडियाचे नेतृत्व करेल. याचा अर्थ रोहित अधिकृत कर्णधार राहील पण पंड्या मैदानावर प्रत्यक्ष कर्णधारी करताना दिसेल. 

भारत-पाक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मोदी स्टेडियम हे हार्दिक पांड्याचं होमग्राऊंड आहे. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. गुजरात टायटन्सचे बरेचसे सामना नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवण्यात आले होते. यातले 90 टक्के सामने गुजरात टायटन्स जिंकलेही होते. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्याचा हार्दिक पांड्याला चांगला अनुभव आहे. कोणत्या वेळी कोणाला गोलंदाजी द्यायची याची माहिती पांड्याला आहे. त्यामुळे पाकिस्तानविरद्धच्या रणनितीत हार्दिक पांड्याचा मोठा वाटा असेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेकचा निर्णयही महत्त्वाचा ठरणार आहे. नाणेफेकसाठीदेखील हार्दिक पांड्याचा सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे.