पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा सारख्या भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या भागात, अपुऱ्या सोयी सुविधांनिशी कोरोना रूग्णांवर उपचार करणारे कर्मचारी हेच खरे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत, असे गौरवोद्गार भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी काढले.
पन्हाळा येथील एकलव्य कोविड केअर सेंटर भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, परिचारिका, पोलीस, शवागरातील कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, आरोग्य पर्यवेक्षक डी. जी. पाटील यांनी या सेंटरअंतर्गत केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला. यावेळी पंचगंगा बँकेचे चेअरमन राजाराम शिपुगडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष सचिन शिपुगडे, मारुती परितकर, अविनाश चव्हाण, दिग्विजय पाटील, माधवी भोसले, इंद्रायणी आडनाईक, अमरसिंह भोसले, सदाम मुजावर, कोरोना योद्धा अनिकेत चौगले, उत्तम बरगे, किसन बुचडे आदी उपस्थित होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीसाठी पाठपुरावा करणार
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नियमित वेतन मिळेल, याची शाश्वती नसतानासुद्धा कोरोनाच्या लढाईत काम केले आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनानंतर शाश्वत नोकरीची संधी देण्यासाठी पाठपुरावा करू, कंत्राटी कर्मचार्यांसह सर्वच कोरोना योद्ध्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही घाटगे यांनी यावेळी दिली.