कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील साखर विक्रीचे संपूर्ण अधिकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना देत आहोत.

सर्वच साखर कारखान्यांच्या साखर विक्रीच्या तपासणीसाठी त्यांनी कोणत्याही कारखान्यात यावे. सर्व साखर कारखाने त्यांना साखर विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड दाखवतील. त्यामुळे श्री. शेट्टी यांचा साखरविक्रीच्या दराबाबतचा संभ्रम आणि गैरसमज दूर होईल. असे नामदार हसन मुश्रीफ यांनी आज स्पष्ट केले.

पुढे माहिती देताना ना. मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, शेट्टी यांनी स्वतः माझे नाव घेतल्यामुळे हे पत्रक मी काढलेले आहे. यापुढे मी त्यांना उत्तरही देणार नाही. कर्नाटक राज्यामध्ये गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे साखरदर साधारणत: 50 रुपयांनी उतरलेले आहेत. लवकरच म्हणजे 15 नोव्हेंबरला केंद्र सरकारचा साखर विक्रीचा कोटा येणार आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याही साखर कारखान्याने जर प्रतिटनाला 3,500 रूपये ऊसदर दिला असेल तर तो माजी खासदार श्री शेट्टी यांनी दाखवून द्यावा. गेल्या दोन-तीन महिन्यात जो वाढलेला दर आहे तो सरासरीने कमी दिसतो. याचीही शहानिशा श्री. शेट्टी यांनी करावी असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.