कागल (प्रतिनिधी) : देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ-को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली ही संस्था सर्वोत्कृष्ठ कारखान्याला वसंतदादा पाटील पुरस्काराने सन्मानित करते. यंदाचा हा पुरस्कार २०२१-२२ साठी कागल येथील छ. शाहू सहकारी साखर कारखान्याला मिळाला असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी आज (गुरुवार) सांगितले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, शाहू साखर कारखान्याला राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर आजअखेर एकूण ६६ पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये ६ पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून आहेत. या ६६ व्या पुरस्कारामुळे  कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे  कारखान्या प्रदान करण्यात येणार आहे. तर हा पुरस्कार छ. शाहू महाराज आणि सभासद, शेतकऱ्यांना अर्पण असल्याचे प्रतिपादन केले.

श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी, कारखान्याला हा मिळालेला पुरस्कार म्हणजे कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखान्याचे विश्वस्त म्हणून भूमिका बजावली. त्यांनी घालून दिलेली तत्त्वे आणि त्याला कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणाने साथ दिली. कारखाना व्यवस्थापनाचे नियोजनाला अधिकारी, कर्मचारी, पुरवठादार यांच्या कष्टाची जोड असल्यामुळे हे शक्य झाले आहे. कारखान्याचा राष्ट्रीय पातळीवर झालेला सन्मान हा छ. शाहूंच्या सभासद-शेतकऱ्यांसह सर्वच घटकांचा सन्मान असल्याचे सांगितले.