कोल्हापूर : कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. उमेदवारांच्या प्रचारार्थ मोठ मोठे नेते सभा घेण्याची तयारी करीत आहेत. गांधी मैदानात एक मे महाराष्ट्रदिनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या तोफा धडाडणार आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील  महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ काँग्रेससह शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाने जय्यत तयारी केली आहे. येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या तोफा या मतदारसंघात धडाडणार आहेत.

याबाबतची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. ते म्हणाले, गांधी मैदानात आघाडीतील पक्षांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. त्यात ‘आप’चे संजय सिंहदेखील सहभागी होणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठी तयारी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. ज्या मतदारसंघात अधिक प्रचाराची गरज आहे, अशा ठिकाणी आवश्यक त्या स्टार प्रचारांच्या सभा घेण्याचे नियोजन महाविकास आघाडीने केले आहे. महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेत्यांच्या सभा होणार आहेत. यासह प्रत्येक प्रभागात एकाचवेळी पदयात्रा काढण्याचे नियोजन केले जात आहे. त्याचा दिवस ठरवण्यात येणार असून, त्याची परवानगी घेण्यात येणार आहे, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.