कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरकरांना काळम्मावाडीतील शुद्ध पाणी मिळावे यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी आज सोमवारी दुपारी महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेत याबाबत मोठं विधान केले आहे.


या पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण होत आले असून दसरा ते दिवाळी या दरम्यान या योजनेचे लोकार्पण करण्यात येईल, या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना निमंत्रित ते म्हणाले.

तसेच कोल्हापूरकरांच्या दिवाळीचे अभ्यंगस्नान थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्याने होणार असल्याने मला आनंद झाला असल्याचे म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत कोल्हापूर शहरासाठी आवश्यक असलेल्या एकूण 21 विषयांवर पालकमंत्र्यांनी विषयवार भाष्य केले आहे.


काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी सरकारने स्वच्छ पाण्यासाठी केले प्रयत्न
२०१०-२०१५ याकाळात सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी सरकारने कोल्हापूरकरांच्या स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी ४८८ कोटींची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर केली होती.

आता या योजनेचे काम पूर्ण झाले असून विजयादशमी दिवशी काळम्मावाडी धरणातील पाणी जलवाहिनीद्वारे पुईखडी येथील जलशुध्दीकरण केंद्रात घेण्यात येईल. त्यानंतर दसरा ते दिवाळी दरम्यान योजनेचे पाणी शहरवासीयांना दिले जाणार आहे. तसेच माजी पालकमंत्री सतेज पाटील आमदार असल्याने त्यांनाही लोकार्पण सोहळ्यास बोलावणार असल्याचं ही मुश्रीफ यांनी यावेळी म्हटले.