ठाणे (प्रतिनिधी) : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा दिला असून ईडीकडून चौकशी सुरू असताना व्हिडिओ चित्रिकरण करण्यास परवानगी दिली आहे.

दिल्लीतून आलेल्या ईडीच्या पथकाने २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर ईडीने चौकशीसाठी प्रताप सरनाईक यांना वारंवार नोटीसा बजावल्या होत्या. ईडीच्या कारवाई विरोधात प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने प्रताप सरनाईक यांची बाजू घेत त्यांना दिलासा दिला आहे.

‘कोणतीही कारवाई ही सूडबुद्धीने करू नये, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. जेव्हा प्रताप सरनाईक यांची चौकशी होईल तेव्हा सरनाईक यांच्या वकिलांच्या उपस्थितीमध्ये चौकशीचे  व्हिडिओ चित्रिकरण करता येणार आहे. मात्र, चौकशी दरम्यान  कोणताही आवाज वकिलांना ऐकू येणार नाही, फक्त पाहता येणार असल्याचेही सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटले आहे.