पुणे : पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल केणार आहेत. महायुतीकडून बारामतीमधून सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून बारामती मधून सुप्रिया सुळे, पुण्यातून रवींद्र धंगेकर आणि शिरूर मधून अमोल कोल्हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी नाव न घेता सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या. “जे कोणी काश्मीर ते कन्याकुमारी निवडणूक लढणार आहेत, ते लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे कश्मीर ते कन्याकुमारी निवडणूक लढणाऱ्या प्रत्येकाला माझ्याकडून शुभेच्छा”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शुभेच्छा दिल्या. पण सुप्रिया सुळेंच्या दिलेल्या शुभेच्छांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राम कृष्ण हरी वाजवा तुतारी; अजित पवारांवर सुप्रिया सुळेंची टीका
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांनी आपल्या भाषणा दरम्यान उपस्थितांना बटण दाबण्यास सांगितले होते. त्यावेळी अजित पवारांनी कचाकचा बटण दाबा असे वक्तव्य केले होते. त्यावरून अनेकांनी अजित पवारांवर टीका केली. अशात, “राम कृष्ण हरी वाजवा तुतारी”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांवर टीका केली.

दरम्यान, अजित पवारांनी सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या, असेही वक्तव्य केले होते. त्यावक्तव्याचा समाचारही सुप्रिया सुळेंनी घेतला. “सातत्याने आरोप करायचे आणि पळून जायचे. पण आज कोण कुठे उभा आहे, त्याला जास्त महत्व आहे. सातत्याने हे तेच बोलत असतात. ही निवडणूक शरद पवारांची आहे की देशाची आहे. पण एक निश्चित आहे की शरद पवारांवर टीका केल्यावर हेडींग बनते. याचाच अर्थ असा की तेच नाणं दहा वर्ष टिकलं आहे. आब्यांच्याच झाडाला लोकं दगड मारत असतात”, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी टीका केली.