कोल्‍हापूर  (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ)  इतिहासात दूध विक्रीमध्‍ये १३  ऑक्टोबररोजी नविन उच्‍चांक नोंदवला. त्याबद्दल आज (गुरूवार) संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालामध्‍ये कर्मचाऱ्यांच्या वतीने संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

गोकुळने उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन करून त्‍यांना जास्‍तीत जास्‍त लाभ  देण्‍यासाठी नेहमीच प्रयत्‍न केलेला आहे. त्‍यामुळेच गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्‍याने वाढ होत आहे. गोकुळने एक दिवसाच्‍या दूध विक्रीचा नविन उच्‍चांक प्रस्थापित करताना १५ लाख १४ हजार ५७१ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात केलेली आहे. ही विक्री सणासुदीची नसून दैनंदिन विक्री आहे.

विश्‍वास पाटील म्‍हणाले  की, दूध विक्रीमध्‍ये नविन मानदंड प्रस्थापित करताना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवला आहे. दिवसाला २० लाख लिटर्स दूध संकलन व तितकीच विक्री करण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवलेले असून हे उद्दिष्‍ट गोकुळ दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासावर साध्‍य करेल. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक,  दूधसंस्था ग्राहक वितरक,  कर्मचारी व वाहतूक ठेकेदार यांचे योगदान मोलाचे असून ते कौतुकास पात्र आहेत.

ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले  की, भविष्यात जास्‍तीत जास्‍त म्‍हशीच्‍या दूध उत्‍पादनाचा टप्‍पा ओलांडण्‍यासाठी गोकुळच्‍या व्‍यवस्‍थापनाने विशेष खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी दूध उत्‍पादकांना विविध प्रकारच्‍या सेवासुविधा देण्‍यावर भर दिला पहिजे.

यावेळी संचालक बयाजी शेळके,  बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, वित्‍त व्‍यवस्‍थापक एच. एम. कापडिया,  पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. यु. व्ही. मोगले,  संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्ही. तुरंबेकर,  कामगार संघटनेचे शंकर पाटील,  शाहीर निकम,  डॉ. साळुंके,  डॉ. गायकवाड,  दत्‍ता वाघरे,  संभाजी पाटील,  जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदीसह अधिकारी,  कर्मचारी  उपस्थित होते. डॉ. प्रकाश दळवी यांनी स्वागत  केले.  वरिष्ठ दूध संकलन अधिकारी धनाजी पाटील यांनी  आभार मानले.