कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना जोडण्यांना वेग आला आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनीही सत्तारूढ आघाडीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यामुळे बाजू भक्कम झाल्याचा दावा सत्तारूढांनी केला आहे. 

आवाडे यांच्या कोल्हापुरातील घरी आ. पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक यांच्या उपस्थितीत आवाडे यांनी आपला पाठिंबा सत्तारूढ गटाला जाहीर केला. गोकुळचा नावलौकीक देशात झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात उत्पादकांना चांगला दर मिळाला आहे. संघाचे कामकाज चांगले चालल्यामुळे सत्तारूढांना पाठिंबा देत असल्याचे आवाडे यांनी यावेळी सांगितले. पी. एन. पाटील यांनी आवाडे यांचे स्वागत केले. यावेळी जि. प. सदस्य राहुल आवाडे, जवाहर कारखान्याचे संचालक अभय काश्मिरे, माणगावचे सरपंच राजू मगदूम आदी उपस्थित होते.

गोकुळच्या निवडणुकीत अशोक चराटी यांनी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर जिल्ह्यातील आणखी एक बडा नेता आघाडीला पाठिंबा देईल, असे सूचक विधान पी.एन. यांनी केले होते. अखेर आवाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने सत्तारूढ आघाडीला बळ मिळाले आहे.