कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छ. शिवाजी महाराज विद्यापीठ अंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या अनेक परिक्षांमधील निकालात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या दूर करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शिष्टमंडळाने कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणा-या अनेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षा विद्यापिठामार्फत घेण्यात आल्या. या परिक्षा अनेक विद्यार्थ्यांनी स्वत: दिल्या. या परिक्षांचे काही दिवसांपुर्वी निकाल जाहीर करण्यात आले.परंतु या निकालात अनेक त्रुटी दिसुन आल्या आहेत. जे विद्यार्थी हजर आहेत,त्यांना गैरहजर दाखवले गेले.  तर काही विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. तसेच यासंबंधी विचारणा केली असता महाविद्यालयांकडून विद्यापीठाकडे चौकशी करा, तर विद्यापीठात गेल्यावर महाविद्यालयाचे पत्र आणावीत असली उत्तरे मिळत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना नाहक मनस्ताप होत आहे.

या प्रकरणी तातडीन आपण लक्ष घालुन विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान कुलगुरु डॉ.शिर्के यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकारात लवकर सर्व त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक योगेश चौगले,युवासेना जिल्हा सरचिटणीस अविनाश कामते, शहरप्रमुख चेतन शिंदे,पियुष चव्हाण,विश्वदीप साळोखे, शहर समन्वयक शैलेश साळोखे, उपशहरप्रमुख दादू शिंदे,आशिष गवळी,विनायक मंडलिक,शुभम शिंदे आदी उपस्थित होते.