कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांत ऊस गळीत हंगाम सुरू होईल. या पार्श्वभूमीवर यंदा साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी द्यावी, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. सुधारित कृषी विधेयकामुळे साठेबाजीवरील नियंत्रण उठवण्यात आले आहे. तरीही कांदा साठ्यावर धाडी टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना सोलून काढा, असे आवाहनही त्यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खोत म्हणाले की, चांगला भाव मिळाल्यास उसाला चांगला दर मिळतो. यामुळे साखरेला क्विंटलला ३४०० रुपये दर करावा. नाशिक परिसरात कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या गोदामावर सरकारकडून धाडी टाकल्या जात आहेत. कांदयाचे भाव वाढले म्हणून धाडी टाकून शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे पाप सरकारकडून सुरू आहे. यामुळे धाडी टाकण्यासाठी येणाऱ्यांची दांडक्याने पाठ सोलून काढावे. शेतकरी अडचणीत आहे. यामुळे शरद पवारांनी २०१९ साली मागणी केल्याप्रमाणे तत्काळ कर्जमाफी करावी. सध्याची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे तातडीने आर्थिक मदत करावी. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी. केंद्र सरकारकडे बोट दाखवत रणांगणातून पळ काढू नये.