छत्तीसगढ (वृत्तसंस्था) : छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी मुलीबाबत केलेल्या धक्कादायक विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अनेक मुली या स्वत:हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप करतात, असे संतापजनक विधान नायक यांनी केले आहे. यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.   

जेव्हा एक विवाहित व्यक्ती एखाद्या तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवते. त्यावेळी मुली ती व्यक्ती आपल्यासोबत कायम राहणार आहे की नाही. याचा विचार करत नाही. पण, विवाहबाह्य संबंध ठेवल्यानंतर नात्यांमध्ये मतभेद होतात. तेव्हा तरुणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यासाठी जातात, असेही त्या  म्हणाल्या.

अल्पवयीन मुलींनी कोणत्याही सिनेमातील फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नये, त्यामुळे तुमचे कुटुंब, मित्र आणि तुमचे आयुष्य यामुळे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या वयाच्या १८ व्या वर्षीच लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. लवकर लग्न झाल्यानंतर लवकर मुले होतात. त्यामुळे त्यांना एकत्र राहण्यास अडचण येते. लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवले जातात आणि त्यानंतर मुलगी ही बलात्काराची तक्रार करते. त्यामुळे मुलींनी पाहिले नाते समजून घेतले पाहिजे. तुम्ही जर अशा नातेसंबधांमध्ये असाल तर त्याचे परिणाम हे वाईटच होणार आहेत असेही नायक यांनी म्हटले आहे.