आजरा ( प्रतिनिधी ) आजरा तालुक्यातील घाटकरवाडी परिसरात गेल्या काही तासांपासून हत्ती धुमाकूळ घालत आहे. या पार्श्वभूमीवर हत्तीला हुसकावण्यासाठी आज वनविभाग आणि ग्रामस्थांनी मोहीम हाती घेतली होती. दरम्यान आज सकाळी हत्तीला हुसकवण्यासाठी वन विभागातील कर्मचारी प्रयत्न करत होते. यावेळी 11 च्या सुमारास हत्तीने अचानक हल्ला केल्याने एका वनकर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या महितीनुसार आजरा तालुक्यात गेली 10 वर्ष हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असतानाच गेले आठ दिवस आजरा तालुक्यातील घाटकरवाडी परिसरात हत्ती धुमाकूळ घालत होता. दरम्यान घाटकरवाडी परिसरातीव वन कर्मचारी प्रकाश गोविंद पाटील (वय 54 ) हे हत्तीच्या हल्ल्यात ठार झाले आहेत.

हत्तीने हल्ला करताना वनकर्मचारी प्रकाश गोविंद पाटील यांना हत्तीने सोंडेत पडकून गरगर फिरवून जमिनीवर जोरात आपटले. व त्यांच्या पोटावर पाय ठेवला. त्यामुळे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर हत्ती चेकाळलेला पाहून वन कर्मचारी आणि गावकरी तेथून पळून गेले. त्यामुळे हत्ती हुसकावण्याची मोहिम पुढे सुरु राहणार का ? असा सवाल आता स्थानिक करु लागले आहेत.