कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महानगरपालिकेच्यावतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २६ जूनपासून राजर्षी छ. शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांगांची नोंदणी करणे, त्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शासकीय विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि आरोग्य विषयक पुढील सेवा उपलब्ध करुन देऊन त्यांच्या अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा या अभियानाचा’ मुख्य उद्देश आहे. या अभियानाची अंमलबजावणी चार टप्प्यात केली जाणार आहे.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व दिव्यांग नागरिकांचा सर्व्हे करून माहिती संकलित केली जाणार आहे. या पहिल्या टप्प्याची सुरवात ५ जुलैपासून होणार असून १० जुलै पर्यंत हा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. यासाठी सर्व आशा दिव्यांग व्यक्तीच्या घरी जाऊन सर्व्हे करुन त्यांचा फॉर्म भरणार आहेत.

यासाठी सर्व दिव्यांगांनी सर्व्हे करायला येणाऱ्या महापालिकेच्या अधिकृत आशा वर्कर्सकडे आपली अचूक माहिती द्यावी. यावेळी आपला फोटो, आधारकार्ड, अपंग प्रमाणपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सुद्धा द्यावीत. तरी शहरातील दिव्यांग व्यक्तींनी आशा वर्कर्स किंवा महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क करून या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.