पुणे  (प्रतिनिधी) : देशात कोरोनाचा कहर कायम आहे. तर दुसरीकडे १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत लस मिळणार का?  यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाची माहिती दिली आहे.   

अजित पवार म्हणाले की, लस मोफत देण्यासंदर्भात १ मे रोजी  आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारची भूमिका या खर्चाची जबाबदारी राज्य सरकारने उचलावी, अशी आहे. तर सर्वच राज्य सरकारांची केंद्र सरकारने ही जबाबदारी उचलावी, अशी भूमिका आहे.

आम्ही या संदर्भात ग्लोबल टेंडर काढणार असून यासाठी ५ जणांची कमिटी तयार केली आहे.  याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत. यानंतर १ मेरोजी मुख्यमंत्री मोफत लसीकरणाच्या संदर्भात भूमिका जाहीर करतील, असे अजित पवार यांनी सांगितले.

लसींच्या पुरवठ्याबाबत सिरमचे अदर पुनवाला यांच्याशी मुख्यमंत्री स्वतः बोलले आहेत. उज्वला गॅस सबसिडी योजनेप्रमाणे आम्ही लसी संदर्भात नागरिकांना आवाहन करणार  आहोत. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वखर्चाने लस घ्यावी, गरिबांना आम्ही मोफत लस देऊ, असेही अजित पवार यांनी सांगितले.