कागल  (प्रतिनिधी)  :  कागल येथील राजमाता जिजाऊ महिला समिती आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने  महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबिर श्रीराम मंदिर येथे बुधवारी (दि.२०)  १० ते ५  या वेळेत आयोजित केले आहे. यावेळी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या तज्ञ डॉ.  रेश्मा पवार  तपासणी आणि मार्गदर्शन करणार असल्याची  माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी दिली.  

त्या म्हणाल्या की,  शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे व  राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरमुक्त कागल अभियान राबवले जात आहे.  महिलांमध्ये हा आजार लपवून ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांमध्ये प्राथमिक अवस्थेत या आजाराचे निदान झाल्यास उपचारांनी तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.  त्यासाठी कागल व गडहिंग्लज विभागामध्ये शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.  या शिबिरात संपूर्ण तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच लक्षणे आढळल्यास उपचाराबाबत  मार्गदर्शन कऱण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा  महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  त्यांनी केले आहे.