कोल्हापूर (प्रतिनिधी) : तुमच्या घरावर करणी केली आहे, असे सांगत ही करणी काढण्याचे आमिष दाखवून तसेच प्रेम संबंध उघड करण्याची धमकी देऊन एका तरुणीला सहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी ज्योती अशोक  भोसले (वय ३२), कमल जाधव (वय ५०), अमित जाधव (वय ३०) हे सर्व रा. टेंबलाईवाडी यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना १५ ऑक्टोंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी शाही मेहबूब मुल्ला (वय २९, रा. टेंबलाईवाडी) या तरुणीने चौघांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, टेंबलाईवाडी येथे शाहीन मुल्ला ही तरुणी आपली आई आणि लहान भावासह राहते. ती खासगी नोकरी करते. गरिबी आणि तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत याच परिसरात राहणाऱ्या ज्योती भोसले आणि तिच्या कुटुंबीयांनी शाहीन मुल्ला हिला तुझ्या घरावर कोणीतरी करणी केली आहे. ती करणी काढण्यासाठी पैशाची मागणी केली. तसेच शाहीन मुल्ला हिचे एका तरुणासोबत असणारे प्रेम संबंध उघड करण्याची धमकी दिली होती. या भीतीपोटी शाहीन मुल्ला हिने घरातील सर्व दागिने ज्योती भोसले यांच्याकडे दिले होते. ते सर्व दागिने ज्योती भोसले हिने विक्री करून त्यातून मिळालेले सहा लाख सात हजार रुपये हडप केले होते. त्यानंतर ती शाहीन मुल्लाकडे पुन्हा वारंवार आणखी पैसे देण्याची मागणी करत होती.

ज्योती भोसले आणि तिच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळुन शाहीन मुल्लाने राजारामपुरी पोलिस ठणायात धाव घेतली. त्यानंतर शाहीनने काल रात्री उशिरा ज्योती अशोक भोसले, कमल जाधव, अमित जाधव आणि भाग्यश्री जाधव या चौघांविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आज (शुक्रवार) ज्योती भोसले, कमल जाधव आणि अमित जाधव या तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ५ ऑक्टोंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे