मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध रसना कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष पिरोजशा खंबाटा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी खंबाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. खंबाटा यांच्या निधनाबाबत रसना ग्रुपच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात निधनाची माहिती देण्यात आली आहे.

खंबाटा यांनी भारतीय उद्योग, व्यापार आणि समाजाच्या सेवेद्वारे सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे. खंबाटा यांनी १९७० च्या दशकात महागड्या शीतपेय उत्पादनांना पर्याय म्हणून रसनाचे परवडणारे शीतपेय पॅक बनवले होते. ज्याला अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळाली.

‘रसना’ आता जगातील सर्वात मोठी ड्राय/लिक्विड सॉफ्ट ड्रिंक उत्पादक आहे. ‘रसना’ हे फळांपासून बनवलेले कोरडे शीतपेय केवळ १ रूपयामध्ये ग्राहकांना उपल्ब्ध आहे. लाखो भारतीयांची रसना हे तहान भागवत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रसना ब्रँड सध्या जगभरातील ६० देशांमध्ये विकला जातो आणि बहुराष्ट्रीय कार्पोरेशन्सचे वर्चस्व असलेल्या शीतपेय विभागात नेहमीच आघाडीवर आहे.