कोल्हापूर ( प्रतिनिधी ) तलाठी भरती परीक्षेचा निकाल 5 जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. या निकालावरुन राज्यात चांगलंच वातावरण तापू लागलं आहे. कारण या परिक्षेत एकूण गुणांपेक्षा अधिक गुण मिळाल्याची अनेक उदाहरण समोर आली आहेत. यावरुन विरोधी पक्षांसह परिक्षार्थींनी ही आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी ही याबाबत आवाज उठवला आहे.

शेट्टी यांनी या परिक्षेबाबत म्हटलं आहे की, या परिक्षांमध्ये दररोज नवनवे परिक्षांतील भ्रष्टाचार समोर येत आहेत. त्यामुळे स्पर्धा परिक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून तलाठी भरतीतील अशा पध्दतीने दररोज अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने खुलासे करावेत अन्यथा विद्यार्थ्यांच्या मनातील शंका ख-या मानाव्या लागतील असा ही टोला लगावला आहे.

नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आहे असे जर सरकारचे म्हणने असेल तर या निकालपत्रातील 200 पैकी 125 पेक्षा जादा गुण ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची एमपीएससी परिक्षा घेऊन पात्रता सिध्द करण्यास संधी द्यावी. जर यामध्ये हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उतीर्ण झाले तर विद्यार्थ्यांचा सरळसेवा भरती प्रक्रियेवर व शासनावर विश्वास बसेल असे ही त्यांनी म्हटले आहे.