कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची वेळ अंतिम टप्प्यात आली आहे. विरोधी राजर्षी शाहू आघाडीकडून हातकणंगलेचे शिवसेनेचे माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांचे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून नाव निश्चित झाले असून त्यांना कामाला लागण्याचे आदेश आघाडीच्या नेत्यांनी दिल्याचे समजते. डॉ. मिणचेकर यांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मंत्री सतेज पाटील यांना संपर्क साधून शिफारस केली असल्याचे समजते.

डॉ. सुजित मिणचेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल  केल्यानंतर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले. ते हातकणंगले तालुक्यातील टोप येथील कल्लेश्वर दूध व्यवसाय सहकारी संस्थेचे ठरावधारक आहेत. ‘गोकुळ’मध्ये यापूर्वी अरुण इंगवले काही वर्षे संचालक होते. त्यानंतर हातकणंगले तालुक्याला प्रतिनिधित्व  मिळाले नाही. हातकणंगले तालुक्यात एकूण ९५ मतदार आहेत. तर शिरोळ तालुक्यात १३६ मतदार आहेत.

जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत हातकणंगले शिरोळमध्ये मतदारांची संख्या कमी असल्याने दोन्ही तालुक्यात म्हणून एखाद्याला संधी मिळत असते. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून डॉ.  मिणचेकर यांनी मागणी केली होती. या गटात छाननीनंतर केवळ नऊ अर्ज शिल्लक राहिले होते. विद्यमान संचालक भुदरगड तालुक्यातील विलास कांबळे, कागलचे चंद्रकांत गवळी आणि सुजित मिणचेकर यांची नावे चर्चेत होती. कागलमधून वीरेंद्र मंडलिक आणि नावीद मुश्रीफ यांची सर्वसाधारण गटातून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे चंद्रकांत गवळी यांचे नाव मागे पडले. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागेही घेतला. तर विलास कांबळे यांनी सत्तारूढ आघाडीत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एक प्रबळ दावेदार आणि हातकणंगले शिरोळ तालुक्याला प्रतिनिधित्व देण्यासाठी डॉ. सुजित मिणचेकर यांचे नाव आघाडीच्या नेत्यांनी निश्चित केल्याचे समजते.

आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ. मिणचेकर यांना कामाला लागावे, असे आदेश दिल्याचे आणि त्याला माजी खा. निवेदिता माने, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ही मान्यता दिल्याचे समजते. आज (सोमवार) शासकीय विश्रामगृहावर झालेल्या नेत्यांच्या बैठकीत या बाबतीत चर्चा झाली.