सोलापूर: लेकीला निवडून आणण्यासाठी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे दिवसरात्र एक करत आहेत. वयाच्या ऐंशी वर्षातही तरुणांना लाजवेल असा ते प्रचार करत फिरत आहेत. वयोमानानुसार थकलेल्या आवाजात, वृद्ध वयात पायी-पायी चालत मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत.सुशीलकुमार शिंदे यांनी वयाचे कारण देत राजकारणातून निवृत्ती घेतली.आता लेक प्रणिती शिंदेला दिल्लीत पाठवण्यासाठी थकलेले सुशीलकुमार वणवण भटकत आहेत. मंगळवारी गुढी पाडवा होता, यानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांनी भारतीय पारंपरिक पेहराव घालून विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. सुशीलकुमार शिंदेनी मंगळवारी सांयकाळी पारंपरिक वेशभूषा धोतर-शर्ट परिधान करून शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यासोबत बैठक केली.

                                               
लोकसभेच्या दंगलमधून बाहेर पडताच सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे लोकसभेच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. वृद्ध आणि थकलेले सुशीलकुमार शिंदे वयाचं कारण देत, राजकारणातून जरी निवृत्त झाले असले, तरी त्यांना लेकीसाठी प्रचारात फिरावे लागत आहे. शिंदेना भर भर चालायला येत नाही तरी देखील पायी चालत लेकीसाठी त्यांचा आटापिटा प्रचारात दिसत आहे.वयोमानानुसार, पार थकून गेलेले वृद्ध माजी मुख्यमंत्री भाषण देखील हळू आवाजात करत होते. लेकीसाठी दिवसरात्र एक केलेले सुशीलकुमार शिंदे यांचा घसा देखील बसला होता. शिंदेना धोतर बाबत विचारताच त्यांनी हसत हसत उत्तर दिलं, गुढी पाडवा आहे, म्हणून पारंपरिक वेशभूषा परिधान केली, ही लुंगी नाही तर धोतर आहे आणि धोतरमधून काहीही संदेश देण्याचा प्रयत्न माझा नाही, असंही ते म्हणाले.

सुशीलकुमार शिंदे पराभवाचा वचपा काढणार का ?
सुशीलकुमार शिंदे यांचा २०१४ आणि २०१९ असा दोन वेळा पराभव झाला होता.आता लेकीच्या रूपाने सुशीलकुमार शिंदे आपल्या पराभवाचा वचपा काढणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.पराभवानंतर दहा वर्षांपासून ते सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. वयाची ऐंशी पार केलेले सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेची जबाबदारी लेकीच्या खांद्यावर टाकत , स्वतःच्या दोन वेळा पराभवाचा बदला घेण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकप्रकारे प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते असा सामना न होता  काँग्रेसचे माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार राम सातपुते, अशी लढत होणार असल्याच चित्र पहावयास मिळतंय.