कोल्हापूर (प्रातिनिधी) :  फुटबॉल वेडे कोल्हापूर शहर अशी कोल्हापूरची एक वेगळी ओळख आहे. बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कोल्हापूरच्या फुटबॉलबद्दल चर्चा असते. कोल्हापूरचे तरुण हे आपल्या भारतीय खेळाडूंबरोबरच बाहेरच्या देशातील खेळाडूंचे देखील समर्थक आहेत.

आपल्या स्टार खेळाडूप्रती असणारे प्रेम दाखवण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे समर्थन करत असतात. २० नोव्हेंबरपासून फिफा वर्ल्ड कप कतारमध्ये सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या देशांच्या संघांचे समर्थन करणाऱ्या गोष्टी बघायला मिळत आहेत.

केरळ, बंगाल आणि गोवा या राज्यांप्रमाणेच कोल्हापुरात देखील फुटबॉलची प्रचंड क्रेझ बघायला मिळते. इथे तालीम आणि पेठांमध्ये अनेक फुटबॉल वेडे तरुण आहेत. फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जशी चुरस असते, अगदी तशीच येथील पेठांमध्ये देखील एक वेगळीच चुरस असते. लिओनेल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो अशा दिग्गज खेळाडूंचा प्रचंड मोठा चाहता वर्ग कोल्हापुरात आहे.

तसेच फिफाच्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात फुटबॉलच्या दिग्गज खेळाडूंचे कट आउट्स लावण्यात आलेले आहेत. कुठे वीस फूट, कुठे पंधरा फूट, तर कुठे पस्तीस फूट अशा प्रकारचे उंचच उंच कट आउट्स लावण्यात आले आहेत. इतकेच नाही तर गल्लीमधील रस्ते देखील वर्ल्ड कपमध्ये सामील झालेल्या देशांच्या झेंड्यांनी सजवण्यात आले आहेत. घरांच्या बालकणीवर खेळाडूंचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर शहरातील गल्ल्या, पेठा आणि चौक येथील वातावरण हे फुटबॉलमय बनले आहे