पन्हाळा (प्रतिनिधी) : सध्याचा काळ हा निवडणूकीचा आहे त्यामुळे पन्हाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सर्वच गावात या कालावधीत यात्रा, आंबेडकर जयंती, गुढीपडावा, रमजान ईद यासारखे धार्मिक सण, सामाजिक उत्सव साजरे होणार आहेत. ते साजरे करत असताना आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई यांनी केले. त्या पन्हाळा येथे निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत बोलत होत्या.

पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी, विशेष करून यात्रेच्यावेळी लावले जाणारे ध्वनीक्षेपक, मनोरंजनाचे कार्यक्रमासाठी योग्यत्या परवानग्या घ्या. या सर्वच कार्यक्रमासाठी असणारी बंधने काटेकोर पणे पाळा. हा आचारसंहितेचा कालावधीत असल्याने यामध्ये होणारे गुन्हे जास्त कडक असतात. त्यामुळे सर्वांनी या कालावधीत कोणताही गुन्हा दाखल होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तसेच याठिकाणी सर्वच समाजात असलेले ऐक्य आदर्शवत आहे. त्यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. हीच परंपरा या आचारसंहितेच्या कालावधीत कायम ठेवावी, असे आवाहन केले.

यावळी शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासाहेब पवार, पन्हाळा पोलिस निरीक्षक महेश इंगळे, माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, चंद्रकांत गवंडी, माजी पोलिसपाटील भीमराव काशीद, सर्व पोलिस पाटील, सरपंच, नागरिक उपस्थित होते.