कोल्हापूर: कोल्हापुरात काल  रात्री ( दि.२१ )  साद शौकत मुजावर (वय २७ रा. आर आर यादव कॉलनी सरनाईक वसाहत कोल्हापूर) याच्यावर  गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या एस. एम. कंपनी गँगच्या आरोपींना २ तासात राजारामपुरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. १) सद्दाम मुल्ला २) मोहसिन मुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गोळीबार झाल्यानंतर जखमी साद मुजावर याला घटनास्थळावर उपस्थित लोकांनी सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीमधील सरनाईक वसाहत या ठिकाणी दि. २१ एप्रिल रोजी रात्री  ११.०० वा चे सुमारास साद शौकत मुजावर (वय २७ रा. आर आर यादव कॉलनी सरनाईक वसाहत कोल्हापूर) हा मोहमदिया मस्जीद जवळ बसलेला असताना त्याच्यावर अचानकपणे दोन मोटारसायकल वरून एस. एम. कंपनी गैंगच्या ४ हल्लेखोरांनी त्यांच्याकडील पिस्तुल गोळीबार करून तसेच त्यांच्याकडील धारदार हत्याराने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूचे लोक जमा होताच हल्लेखोर पसार झाले. जखमी साद शौकत मुजावर हा आरोपी सद्दाम मुल्लाने मोका अंतर्गत दाखल झालेल्या गुन्हयामध्ये साक्षीदार असून त्याच गुन्हयातील आरोपीशी जखमी साद मुजावर बोलतो म्हणून त्यांच्यात मागील मागील १ वर्षापासून वाद सुरू होते. त्या वादातूनच चिडून दि. २१ एप्रिल रोजी २३.०० वा सुमारास जखमी साद मुजावर हा सरनाईक वसाहत येथील मोहमदिया मस्जीदजवळ बसलेला असताना १) सद्दाम मुल्ला २) मोहसिन मुल्ला, ३) मनिष नागोरी व ४) साहिल नदाफ यांनी अचानकपणे येवून त्यांच्याकडील पिस्तुल  या अग्नीशस्त्रातून गोळीबार करून व धारदार हत्याराने डोक्यात वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील व राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर कडील अधिकारी अंमलदार यांची पथके तयार करून आरोपींचा शोध सुरु केला.या गुन्हयातील मुख्य आरोपी सद्दाम सत्तार मुल्ला, वय ३५ रा यादवनगर मेन रोड, कोल्हापूर व २) साहिल रहिम नदाफ वय २२ रा यादवनगर मेन रोड, कोल्हापूर यांना अवध्या २ तासातच ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेले पिस्तुल देखील जप्त करण्यात आलेली आहे. ही कारवाई कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक, जयश्री देसाई, शहर उप विभागीय पोलीस अधिकारी, अजित टिके, करवीर उप विभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे व त्यांच्याकडील  अधिकारी अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व पथकाने केली.