बारामती  (प्रतिनिधी) :  राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर आपण फटाके फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. बारामतीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन आज (मंगळवार) करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

दिवाळी सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात फटाके फुटणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका,  असा  टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नांव न घेता फडणवीस यांना लगावला. कोरोना संपलेला नाही. त्यामुळे मी हे विधान करतोय,  अशी टिप्पणीही त्यांनी करताच सभागृहात एकच हस्यकल्लोळ उडाला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मला यायला अडचण होती. पण ती अडचणही सांगून टाकतो. दोन चार दिवसांपासून माझे पाय धरले. कोणी पाय धरावे एवढा मोठा मी झालो नाही. आपले आपलेच धरले. त्यामुळे चालायला आणि उभं राहायला त्रास झाला. पण मी कधीच डगमगत नाही.  शरद पवारांसारखा तरणाबांड नेता आपल्यासोबत आहे. पवारसाहेब महाराष्ट्राचं आणि संस्थांचे  नेतृत्व करत आहेत.  सर्व कुटुंबच तळमळीने काम करत आहे. कुटुंब रंगलं काव्यात, तसं पवार कुटुंब एका ध्यासात रमलं आहे,  अशी स्तुतीसुमने त्यांनी  यावेळी उधळली.