कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  उसने दिलेल्या पैशाची मागणी करणाऱ्या कृष्णात ईश्वरा पाटील (रा. कसबा आरळे, ता. करवीर) यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या नैराश्यातून त्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल दत्तात्रय धुळाप्‍पा पाटील, शिल्पा दत्तात्रय पाटील, उत्तम धोंडिराम शिंदे व संतोष पिराजी शिंदे यांचेवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कृष्णात पाटील यांच्या मुलगा श्रीकांत पाटील (वय २५) याने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आरळे येथील कृष्णात पाटील यांच्याकडून दत्तात्रय धुळाप्‍पा पाटील व शिल्पा दत्तात्रय पाटील यांनी घर बांधकामासाठी तीन वर्षांपूर्वी ५० हजार रुपये उसने घेतले होते. १५ नोव्हेंबर रोजी कृष्णात पाटील यांनी दत्तात्रय पाटील व शिल्पा पाटील यांच्याकडे उसने दिलेल्या पैशाची मागणी केली होती. त्या वेळी कृष्णात पाटील यांना पैसे परत करण्यास नकार देत चौघांनी मिळून कृष्णात पाटील यांना बेदम मारहाण केली होती. तसेच तुमचे पैसे परत देणार नाही व व पैसे मागितल्यास तुमच्यावर खोटी तक्रार दाखल केली जाईल अशी धमकी दिली होती. त्यांच्या या त्रासाला कंटाळलेल्या कृष्णात पाटील यांनी नैराश्यातून २२ नोव्हेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. या चौघांनी आपल्या वडिलांना मारहाण करून धमकी देऊन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद त्यांचा मुलगा श्रीकांत पाटील यांनी दिली. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.