गांधीनगर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील एका खासगी भिशी चालवणाऱ्या महिलेने भिशीची रक्कम घेऊन पोबारा केल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुरेखा सुरेश बोरकर (मूळ गाव कोते, ता.राधानगरी) तिचे नाव असून तिच्यावर ७ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पण ही रक्कम सुमारे चाळीस लाख पेक्षा जास्त असल्याची चर्चा गांधीनगर परिसरात होत आहे.
माधवी संजय बागडे, जयश्री आप्पासाहेब शेळके, कविता अभिजीत पावले, शितल शंकर कवठेकर, अर्चना सतीश शेळके, काजल शिवराम ठाकूर, श्रद्धा गायकवाड, मंजुळा देवेंद्र अमृसकर, मोहिनी मिलिंद साखरे, अर्चना रणजित देसाई, शुभांगी विलास मोहिते, गीता बाप्पू हुल्ले अशा फसगत झालेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणाबद्दल गांधीनगर पोलिसांनी अखेर गुन्हा केला आहे. या प्रकरणी फसगत झालेल्या आणखी काही महिला पुढे येण्याची शक्यता संबंधित महिलांकडून व्यक्त होत आहे. ही रक्कम सुमारे ४० लाखांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यामध्ये फसगत झालेल्या माधवी संजय बागडे (रा. कोयना कॉलनी, गांधिनगर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सुरेखा बोरकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करीत आहेत.