मुंबई (प्रतिनिधी) : वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प आणण्याचे गाजर शिंदे-फडणवीस सरकारने दाखवले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची दिशाभूल करीत असल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला. फडणवीसांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न करू नये असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एअरबस प्रकल्पावर उत्तर आले. त्यामुळे फडणवीसच राज्यकारभार चालवत आहेत; पण राज्याचे प्रमुखांनी यावर उत्तर द्यायला हवे, पण आजच्या पत्रकार परिषदेत फडणवीसांसोबत मुख्यमंत्री नव्हते नाहीतर त्यांनी माईक ओढला असता.

आदित्य ठाकरे म्हणाले, रायगडचा वीस हजार कोटींची प्रकल्प भाजपने आणला असा दावा केला जात आहे. त्यांनी क्रेडिट घ्यावे पण आम्हीच सर्व केले इतरांनी काही केले नाही, असे योग्य नाही. राज्यात दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असून, फडणवीसांनी फाॅक्सकाॅनबाबत देसाईंची जी बातमी दाखवली त्यातील पूर्ण बातमी फडणवीस यांनी वाचायला हवी होती. मागच्या सरकारचे काम पुढचे सरकार करीत असते. फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न सोडून द्या. दिशाभूल करू नका. दोन उद्योग आले होते ते दुसरीकडे गेले ते प्रकल्प रद्द झाले.

आदित्य ठाकरे म्हणाले्, खोके सरकार खोटे सरकार आहे. जर ते उद्योग प्रमुखांना भेटले नाहीत तर मग ट्विट कशाला करीत आहेत. ते जे आकडे सांगत आहेत ते मुळात कमी असतात पण ते फुगवून सांगत आहे्त. बल्कड्रग्ज पार्क आणि मेडीकल हबसाठीचे प्रस्ताव आम्ही दिले. शासनाचा प्रस्ताव केंद्राकडे गेला, आम्ही जर खोके बोलत होतो तर सुभाष देसाईंचे ट्विट खोटे आहेत का? आ्म्ही वित्त आयोगाची भेट घेतली. बल्क ड्रग्ज पार्कसाठी सहाय्य करण्याची आम्ही विनंती केली, त्याची बातमी आली ते खोटे आहे का?