औरंगाबाद (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज (गुरूवार) येथे टोला लगावला आहे. भाजपच्या आमदारांनी पक्ष सोडू नये, म्हणून  देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे सरकार पडणार, असे वारंवार सांगत राहावे लागत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांना आपली माणसे टिकवण्यासाठी सरकार पडणार, असे सारखे बोलाले लागत आहे. आणखी काही काळ ते असेच बोलत राहतील. त्यानंतर फडणवीस यांचे बोलणे आपोआप बंद होईल, असेही पाटील म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मी एकत्र पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराचा फॉर्म भरायला जाणार आहोत. काँग्रेसची कुठलीही अडचण होणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.