मुंबई (प्रतिनिधी) : माझ्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला आहे. पण सरकार माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. मला चर्चेची संधी दिली तर एका महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवेन, असा दावा बंजारा समाजाचे नेते, माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला.

आज (मंगळवार) प्रसारमाध्य प्रतिनिधींना त्यांनी सांगितले की, आरक्षणप्रश्नी व्यक्त केलेल्या मतांवरून मला चेष्टेचा विषय केले जात आहे, हे ओबीसी आणि मराठा समाजाचे दुर्देव आहे. मला चर्चेची संधी दिली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न एका महिन्यात सोडवून दाखवेन. सर्वांचेच आरक्षण रद्द करण्याविषयीचे खा. उदयनराजेंचे वक्तव्य देशात पुन्हा राजेशाही आणणारे आहे. आम्ही बहुजन समाजाचे लोक नेहमीच छत्रपतींचा आदर करतो. मात्र खासदारच असे जर बोलायला लागले तर असं वाटते की त्यांना परत राजेशाही आणायची आहे.