आंतराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी जपानी नागरिकांच्या वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले तर जपानी नागरिक सुखरूप बचावले. पोलिसांनी सांगितले की, कराचीच्या लांधी भागात एका आत्मघाती हल्लेखोराने जपानी नागरिकांच्या वाहनाला लक्ष्य करून स्फोट घडवून आणला. या वाहनात पाच जपानी नागरिक होते, ते सुरक्षित आहेत.

या हल्ल्यात सहभागी दोन दहशतवादी मारले गेल्याचे पोलिसांनी सांगितले. माजी डीआयजी अजफर महसर यांनी डॉनला सांगितले की, हा हल्ला हमलालंधीमधील मुर्तजा चोरंगीजवळ झाला. हे पाच परदेशी नागरिक हायएस व्हॅनमधून त्यांच्या क्लिफ्टन येथील निवासस्थानापासून निर्यात प्रक्रिया क्षेत्राकडे जात होते. पाचही जपानी सुखरूप आहेत मात्र त्यांच्यासोबत असलेला खासगी सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे.


अझफर महसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हल्लेखोर पायी आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून सहा हातबॉम्ब, एक एसएमजी आणि तीन मॅगझीन जप्त केले आहेत. हल्लेखोरांच्या बॅगेत पेट्रोलच्या दोन बाटल्याही होत्या. सर्व सामान हल्लेखोरांकडे एका पिशवीत होते. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला तर दुसरा दहशतवादी व्हॅनजवळ आला आणि त्याने स्वत:ला उडवले. एसएसपी मालीर तारिक मस्तोई यांनी हा आत्मघाती हल्ला असल्याची पुष्टी केली. त्याने सांगितले की, दहशतवाद्याच्या अंगावर सुसाईड वेस्ट आणि ग्रेनेड बांधलेले होते. त्यांनी सांगितले की बॉम्ब निकामी करणारे पथक हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले आहे.

काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी ?

या हल्ल्यातून बचावलेल्या जपानी नागरिकांसोबत उपस्थित असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, ‘परदेशी तीन वाहनांच्या ताफ्यात प्रवास करत होते. एक सुरक्षा वाहन पुढे जात होते, तर त्यांच्या मागे एका व्हॅनमध्ये चार परदेशी आणि त्यामागे एक एसयूव्हीही परदेशी लोकांना घेऊन जात होती. परदेशी लोकांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ एसयूव्ही सुरक्षित ठेवण्यासाठी ती परत हलवली. पहिला गोळीबार हल्लेखोरांनी केला आणि त्यानंतर जोरदार स्फोट झाला. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि चकमक सुरू झाली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक हल्लेखोर ठार झाला.