कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचे समूळ उच्चाटन करा, अन्यथा या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचा व्यापार आणि वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष केले जात आहे. तर अंमली पदार्थांच्या व्यवसायासह गोव्यातून चोरटी दारू आणून खरेदी विक्री करण्याचे चंदगड केंद्र बनले आहे. यावेळी अंमली पदार्थ आणि चोरटी दारूवर निर्बंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नेमावे, चंदगड़, आजरा, गडहिंग्लज, कागल, गगनबावडा या ठिकाणी संयुक्त तपासणी नाके कार्यान्वित करावीत. आणि चंदगडमध्ये मुंबई पोलीस क्राईम ब्रँचने एका फॉर्म हाऊसवर छापा टाकून अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई कऱण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, नरेश तुळशिकर, राजेंद्र पाटील, अवधूत साळोखे, मंजित माने, संजय जाधव, राजू जाधव, संजय स्वामी, नितीन पाथरवट , अभिजित बुकशेट आदी उपस्थित होते.