धुळे : समान नागरी कायदा म्हणजे आपल्या सर्वांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कुटील कारस्थान असल्याचा खळबळ जनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांची वाताहात लावली आहे. २०१४ मध्ये असलेल्या शेतमालाच्या भावाशिवाय सर्व वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. केवळ शेतमालाचे भाव २०१४ मध्ये होते. त्यापेक्षा कमीच झाले आहेत. खते, औषधे, बियाणे, औजारे यांच्या दरात दुपटी-तिपटेने दरवाढ झाली आहे. शेतमाल बाजारात येताच शेतीमालाचे भाव मात्र तासा-तासाने कमी का होतात?, याचा शेतकऱ्यांनी विचार करावा, असं आवाहनही गोटे यांनी केलं आहे.

कांदा, सोयाबीन, कापूस इत्यादी शेती उत्पादनाचे भाव ठरवून पाडले जातात. शेतकरी जीवनप्रवास संपवीत आहेत, त्याचे या सरकारला काही घेणे-देणे नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी भाजपाला मत देवू नये. भाजपाच्या प्रचारकांना व वाहनांना गावा बाहेर हाकलून लावणे, हे देशभरात सर्वत्र सुरू आहे. गावोगाव शपथ घेवून भाजपाला अजिबात मतदान करू नये. असा संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे. असे मत देखील गोटे यांनी व्यक्त केले आहे.

…तरीही शिवाजी महाराजांच्या स्मारकावर पैसे कसे खर्च झाले ? –              

भारतीय जनता पक्ष उच्चवर्णीय व उच्चवर्गीय लोकांचा आहे. भारतीय जनता पक्ष मराठा द्वेष्टा आहे. अरबी समुद्रात महाराष्ट्रच आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधण्याची घोषणा सरकारने केली. परंतु केंद्रात दहा वर्षे व राज्यात साडेसात वर्ष सत्ता असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या एका विटेचे बांधकाम सुध्दा झाले नाही. तरीही १६ कोटी २८ लाख रूपये महाराजांच्या स्मारकाच्या खर्चापोटी कसे खर्च झाले, असा सवालही गोटे यांनी यावेळी केलाय. छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांना भाजपाच्या नेत्यांनी दिल्लीत तब्बल तीन दिवस ताटकळत ठेवले. सिनेतारका कंगणा रणावत व नवनीत राणा यांना मात्र पाचच मिनिटात भेट दिली. छत्रपतींच्या वंशजाचा म्हणण्यापेक्षा मराठ्यांचा अजून किती अपमान होणे बाकी आहे? ही भाजपाची मस्ती उतरविण्याची संधी मराठ्यांना चालून आली आहे. दवडू नका, असे आवाहनही अनिल गोटे यांनी केले.