कोल्हापूर (विजय पोवार) :  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यात विरोधी पॅनल तयार होण्यासाठी खऱ्या अर्थाने कळीचा मुद्दा ठरले त्या प्रक्रिया संस्था गटात सर्वच पक्षांच्या नेत्यांची आणि राष्ट्रवादी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या गटाची निवडणूक आता उमेदवारांपेक्षा नेत्यांनी हातात घेतली आहे.  

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीचे नेते ना. हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळच्या यशानंतर जनसुराज्य नेते आ. विनय कोरे यांना घेऊनच लढण्याचा चंग बांधला होता. आ. विनय कोरे यांनी हीच संधी साधून आपल्या विधानसभा मतदारसंघातील विरोधकांना संपवण्याची चाल पुढे केली. यासाठी जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादीचे असलेले प्रक्रिया संस्था गटातील संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांना डावलण्याची अट घातली. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या दुसरा उमेदवार दिला तरी चालेल असेही सुचवले. याच गटातून दुसरे संचालक होते शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक.

विनय कोरे यांना सोबत घेताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही जागा बिनविरोध  करण्याचा डाव मांडला. यातून महाडिक, आवाडे या भाजपप्रणीत नेत्यांशीही जमवून घेतले.  त्याचा परिणाम महाआघाडीत असलेल्या शिवसेनेवर होऊ लागला. त्यामुळे शिवसेना प्रथम पाच जागांची  मागणी करीत अखेर तीन जागांवर ठाम राहिली. जागावाटपात तडजोड न झाल्याने शेकाप, रिपाई यांच्यासह काही असंतुष्टांना घेऊन शिवसेनेने विरोधी पॅनल तयार केले.

आ. विनय कोरेंसाठी मंत्री मुश्रीफ-पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांना डावलले. पण खा. संजय मंडलिक यांनी या गटातील बाबासाहेब पाटलांचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांना आपल्याबरोबर घेतले. आता विरोधी पॅनलचे नेतृत्व करण्याची जबाबदारी खा. संजय मंडलिक यांच्यावर आहे. ते प्रक्रिया संस्था  गटातील उमेदवारही आहेत. त्यांना स्वतः निवडून येऊन पॅनेललाही यश मिळवून द्यायचे आहे. खा. संजय मंडलिक यांचा मंत्री मुश्रीफ-पाटील यांच्याशी असलेला राजकीय सलोखा  संपूर्ण जिल्ह्याला माहित  आहे.

सत्तारूढ आघाडीतून प्रक्रिया संस्था गटात राष्ट्रवादीचे प्रदीप पाटील भुयेकर आणि इचरकरंजीचे मदन कारंडे उमेदवार आहेत. दोघांचीही सहकार, सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक क्षेत्रातील पार्श्वभूमी चांगली आहे. पण जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ते नवखे आहेत. त्यामुळे सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांना पाटील-कारंडे यांना निवडून आणणे सर्व दृष्टीने प्रतिष्ठेचे बनले आहे. यासाठी आता उमेदवारांचे संपर्क, प्रचार, मेळावे,  व्यक्तिगत गाठीभेटीचे दौरे सुरू आहेत  या गटाची निवडणूक मात्र नेत्यांनीच आपल्या हातात घेतली आहे.

जिल्ह्यात एकूण या गटामध्ये ४४८ मतदार असलेल्या आहेत. यामध्ये कागल १०३, पन्हाळा ८५, शाहूवाडी ६, शिरोळ ५६, हातकणंगले, करवीर प्रत्येकी ४५, चंदगड ३२, भुदरगड २१, राधानगरी ११, आजरा ८, गडहिंग्लज ७, गगनबावडा ६, कोल्हापूर शहर २० अशी मते आहेत. यातील राष्ट्रवादीच्या नेते ना. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील के. पी. पाटील यांच्यामुळे कागल, राधानगरी, भुदरगडमध्ये सत्तारूढ आघाडीला चांगली मते मिळणार आहेत. शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, येथे मुश्रीफ-पाटील यांचे सहकार्य आणि कोरे,  आवाडे, महाडिक, यड्रावकर, माने, शेट्टी हे सर्व नेते एकत्र असल्यामुळे याठिकाणीही सत्तारूढ आघाडीच्या पारड्यात चांगली मते पडणार आहेत.

करवीर, गगनबावडा, कोल्हापूर शहर या ठिकाणी  ना. सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, अरुण नरके, यांच्यामुळे सत्तारूढ आघाडीला फायदा होणार आहे. चंदगडमधील ३२ पैकी आ. राजेश पाटील यांच्याकडे २६ मते आहेत. ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जिल्हा बँकेत विकास संस्था गटात सत्तारूढ आघाडीतून ते बिनविरोध निवडून आले आहेत. आ. राजेश पाटील विरोधी आघाडीतील नेते खा संजय मंडलिक यांचे मेहुणे आहेत. तरीही त्यांना व्यक्तिगत नातेसंबंधापेक्षा आघाडी धर्म पाळावा लागेल.

विरोधी गटात खा. संजय मंडलिक आणि बाबासो पाटील यांची कागल, राधानगरी, भुदरगड आणि पन्हाळा या तालुक्यातच काही मतावर भिस्त आहे. त्यामुळे नेत्यानीच हातात घेतलेल्या प्रक्रिया संस्था गटाच्या या निवडणुकीत सध्या तरी सत्ताधारी आघाडीचेच प्राबल्य दिसून येत आहे.