मुंबई (प्रतिनिधी) : भाजप सोडताना मला दु:ख होतंय. माझा भाजपवर राग नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरुद्ध नेहमीच कारस्थाने केली. याला कंटाळूनच मी भाजपचा त्याग करतोय. हा निर्णय घेतल्यानंतर भाजपमधील कोणत्याही नेत्याचा फोन आलेला नाही. केवळ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीच मला फोन केला. त्यांनी पक्ष न सोडण्याची विनंती केली, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधील इतर नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली.
भाजपमध्ये नाराज असलेले खडसे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत भाजपचा त्याग करीत असल्याची घोषणा केली. शुक्रवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची सांगितले. त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भोसरी एमआयडीसी भूखंडाचं प्रकरणी चौकशी लावली, त्या सर्वांमधून मी सुटलो, पण मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल कऱणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं. उद्या बलात्काराचा आरोप करतील. त्यामुळे भाजपा सोडण्याच्या वेदना आहेत, पण इतक्या खालचं राजकारण करणाऱ्यांसोबत काम करणं कठीण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पदावर आहेत त्यांचं भाजपासाठी काय योगदान आहे अशी विचारणा करणार आहे. पक्षात घेतलेल्यांना मंत्रीपदं दिली. आम्ही ४० वर्षे घालवली. पण पदासाठी लाचार नव्हतो. फडणवीसांनी आरोप करण्याआधी कोणीही आरोप केलेला असेल तर सांगा. माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम यांनी केलं. त्यामुळेच पक्षत्याग करावा लागतोय. मी माझा राजीनामा चंद्रकांत पाटील यांचेकडे पाठवला. या निर्णयानंतर भाजपमधील चंद्रकांतदादा पाटील वगळता कोणत्याही नेत्याने माझ्याशी संपर्क केला नाही. दादांनी फोनवरून मला विनंती केली की, तुम्ही पक्ष सोडू नका. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. तुम्ही गेल्याने पक्षाचे मोठे नुकसान होईल. मात्र माझा निर्णय ठरलेला होता, असे म्हणत खडसे यांनी भाजपच्या इतर नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली.