कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडी गावचे ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागात किंवा संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च विद्यापीठाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी गुरुवारी सायंकाळी बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या घरी भेट देऊन त्यांचे वडील रामचंद्र हरी जोंधळे आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव उपस्थित होते. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने शहीद जोंधळे यांना श्रद्धांजली वाहिली.

त्याचप्रमाणे विद्यापीठातर्फे शहीद लष्करी, निमलष्करी जवान आणि शहीद पोलीस यांच्या अपत्यांना सर्व शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार शहीद जोंधळे यांच्या कुटुंबातील पाल्यासही संलग्नित महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शैक्षणिक खर्च देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या वतीने तसे पत्रही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी रामचंद्र जोंधळे यांच्याकडे सुपूर्द केले.