कोल्हापूर (प्रतिनिधी) : मॉन्सुनच्या परतीच्या पावसाने जोरदार झोडपून काढले आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. परिणामी यंदाचा ऊस गाळपाचा हंगाम लांबणीवर पडणार आहे. काही कारखान्यांनी ऊस तोडणी मजूर कारखाना कार्यस्थळावर आणले आहेत. पण पावसामुळे ऊस तोडणी सुरू करता आलेली नाही.

ऑक्टोबर महिना सुरू झाला की ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना गळीत हंगामाचे वेध लागतात. कारखानदार दसरा झाल्यानंतर ऊस गाळपाला सुरूवात करतात. पण यंदा परतीचा प्रचंड पाऊस पडत आहे. यामुळे ऊस शेतात मोठ्या प्रमाणात पाणी थांबले आहे. ओल असल्याने शेतातून ऊस वाहतूक करणे शक्य नाही. जोपर्यंत जमिनीत वापसा येणार नाही, तोपर्यंत यं!ाच्या सहाय्याने ऊस तोडणे अडचणीचे आहे. कोरोनामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषदही उशिराने म्हणजे २ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामध्ये दर निश्चित झाल्यानंतर कारखानदार दर जाहीर करतील. त्यानंतर कारखान्यांची धुराडी पेटणार आहे. यापार्श्वभूमीवर यंदा हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबरचा पहिला आठवडा उजाडणार आहे.