कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकीकडे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंचे भाव वाढले असताना नित्याच्या खाण्यासाठी लागणारा कांदाही महागला आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या कांद्याचा किलोचा दर ५० रुपये झाला आहे. कांद्याच्या दराने उसळी घेतल्याने सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यात केल्याने दर कोसळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सध्या याउलट चित्र आहे. खुल्या बाजारात दर्जानुसार कमीत कमी ३० आणि अधिकाधिक ५० रुपये किलो असा कांद्याचा भाव आहे. मागील आठ दिवसांत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक चांगली झाली आहे. सोमवारी ३५०८ कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली. दोन आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याचा भाव खूपच वाढला आहे. नवीन कांदे बाजारात विक्रीसाठी येईपर्यंत दर चढाच राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आधीच महागाईने मेटाकुटीला आलेला सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे.